shivsena bjp, उद्धव ठाकरेंकडून भाजपसोबत तडजोड नाहीच? मोदी सरकारवर पुन्हा थेट हल्ला – saamana editorial shivsena criticizes pm narendra modi government over situation in parliament
मुंबई : एकनाथ शिंदे आणि पक्षातील दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना सध्या ऐतिहासिक संकटात सापडली आहे. एकीकडे आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिलेलं असतानाच शिवसेनेच्या खासदारांकडूनही भाजपसोबत युती करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत राजकीय तडजोड करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं भाजपविरोधी भूमिका कायम ठेवून एकाधिकारशाहीचा आरोप करत केंद्रातील मोदी सरकारवर आक्रमक टीका केली आहे.
‘सध्याच्या पार्लमेंटचे एकंदरीत चित्र आधीच निराशाजनक आहे. त्यात एकीकडे तथाकथित ‘असंसदीय’ शब्दांची चिकटपट्टी संसद सदस्यांना लावण्यात आली आहे आणि दुसरीकडे संसद भवन परिसरात निदर्शने, धरणे, उपोषण, आंदोलन करण्याला केंद्र सरकारने बंदी घातली आहे. म्हणजे विरोधकांची शब्दांची शस्त्रेही निस्तेज करायची आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकारावरही गदा आणायची, असा हा संसदेची टाळेबंदी करण्याचा डाव आहे. तुम्ही संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. औरंगाबाद, उस्मानाबादप्रकरणी श्रेयवादाची लढाई; शिंदे सरकारचा नामांतरासाठी नव्याने ठराव?
‘हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो…’
मोदी सरकारवर याआधीही विरोधी पक्षांकडून हुकूमशाहीचे आरोप करण्यात आले आहेत. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात एक उदाहरण देत हुकूमशाहीच्याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. हरिशंकर परसाई यांनी म्हटलं आहे, ‘हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे’ आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही,’ अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.
दरम्यान, एकीकडे बंडखोर आमदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात असताना शिवसेनेच्या नेतृत्वाने मात्र भाजपविरोधातील आक्रमक बाणा कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातही शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.