विजय शिवतारे यांनी गुरूपौर्णिमेला उद्धव ठाकरे यांची भेट न घेता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणं पसंत केलं होतं. या भेटीचा फोटोही शिवतारे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला होता. यातून त्यांनी शिवसेना नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवरच अखेर आता शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात विजय शिवतारेंचा राजकीय संघर्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात विजय शिवतारे हे पवार कुटुंबाला राजकीय आव्हान देत असल्याचं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. बारामती तालुक्याला लागून असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवतारे यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. तसंच २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी शिंदे गटात सामील होणं पसंत केलं. परिणामी विजय शिवतारे यांना शिवसेना नेतृत्वाच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.