चंद्रपूर : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगावला पुराने वेढा दिला आहे. परिणामी गावाचा संपर्क तुटला असून येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अशा बिकट स्थितीत वाघाडे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. कुटुंबातील साहिल कालिदास वाघाडे या मुलाला मेंदूज्वर झाला आणि त्याचे आरोग्य खालावले. तोहोगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र पुराच्या पाण्यातून मार्ग काढत रूग्णाला न्यायच कसं? हा कठीण प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला होता. मात्र या संकटकाळात गावातील नागरिकांसह प्रशासनही वाघाडे कुटुंबाच्या मदतीला धावून आल्याचं पाहायला मिळालं.

गावाचे उपसरपंच फिरोज पठाणा यांनी गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम यांना फोनद्वारे या संकटाची माहिती दिली. तहसीलदारांनी वेळ न दवडता कन्हाळगाव अभयारण्यातील कन्हाळगाव कॅम्प नंबर चार या घनदाट मार्गे रूग्णवाहिका घेऊन ते गावात दाखल झाले. मात्र या मार्गावर झाड कोसळले होते. त्यामुळे वाहन पुढे जाऊ शकत नव्हते आणि नाईलाजाने रूग्णवाहिका माघारी फिरवली. हे कळताच कुटुंबाची धाकधूक वाढली. मात्र आज पहाटेच कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तुषार चव्हाण यांनी पोलीस जवान आणि वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले.

पर्यटकांच्या उत्साहावर पाणी; मुंबई जवळच्या ‘या’ दोन शहरांत पर्यटनबंदी जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत निर्बंध

या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांनी मार्गातील कोसळलेले झाड हटवलं अन् मार्ग रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला. वाटेतील संकट दूर झाल्याची माहिती मिळताच कोठारे कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला. कोठारी ठाणेदार चव्हाण यांनी लाकडी नावेच्या साहाय्याने गाव गाठले आणि रूग्णाला घेऊन चार नंबर मार्ग गाठला. दुसरीकडे तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी रूग्णवाहिकेने घटनास्थळ गाठले. त्यानंतर रूग्णाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तालुका प्रशासनाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here