मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबतच्या पत्रकार परिषदेत माईक ओढून घेणे आणि चिठ्ठी देणे या प्रकारावरून टीका झाल्यानंतर पुन्हा असं होऊ नये याची खबरदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येत असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेत दिसलं आहे. दोन माईक ठेवलेले आहेत आणि कोणतीही चिठ्ठी नाही, असं पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना शिंदेंसमोरचा माईक ओढून घेतला होता. त्यावरून बरीच टीका झाली होती. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेण्यात आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान कधी झाला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. तर हे सरकार टिकणार नाही यांची आतापासूनच माईकची ओढाओढी सुरू झाली, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं होतं.

माईक ओढण्याच्या प्रकारानंतर दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी चिठ्ठीवर मजकूर लिहून शिंदेंसमोर चिठ्ठी सरकवली होती. यावरूनही टीका होत आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सावध झाले असून शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन माईक ठेवण्यात आले होते. तसंच कोणतीही चिठ्ठी नाही असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतरावर निर्णय, औरंगाबाद आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर

माईक ओढला नाही, कागदावर लिहिलं नाही, पण कानात सांगितलंच…

आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास विभागाच्या एका निर्णयाबाबत माहिती सांगण्यास विसरल्यानंतर त्यांनी शिंदे यांना कानात सांगत याबाबतची आठवण करून दिल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी एमएमआरडीएबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

पर्यटनाला आले, वळणावर अंदाज चुकल्यानं कार नदीत, भंडारदरा परिसरात तीन पर्यटक बुडाले

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी बँक कर्जाला शासनाची हमी

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबवण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसंच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात १ लाख ७४हजार ९४० कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम २१ नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार ६० हजार कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here