बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारने घेतलेल्या नगराध्यक्ष आणि सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करता, तर मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करा. तसंच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष इतकेच नव्हे तर राष्ट्रपतिपदाची निवडणूकही अशीच घ्या,’ असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, ‘थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीमुळे राज्यातील काही ठिकाणी नगराध्यक्ष आणि सरपंच वेगळ्या विचारांचे आणि खालील सदस्य मात्र वेगळ्या विचारांचे, असं होतं. त्यावेळी नगराध्यक्ष इतर नगरसेवकांना विचारात घेत नाही. कोण्या एकाच व्यक्तीकडे तेथील सत्ता केंद्रित होते, जे लोकशाहीला मारक ठरते.’

माईक ओढाओढी अन् चिठ्ठीबाबत फडणवीस सावध; आजच्या परिषदेत दोन माईक आणि चिठ्ठीही नाही, पण…

‘…तर निवडणुका थांबवणार का’

राज्य सरकारने बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदान करण्याचा हक्क देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचं स्वागत करत असताना अजित पवार यांनी काही शंकाही उपस्थित केल्या आहेत. ‘शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र निवडणुकीचा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाही. खर्च झेपणार नसेल तर निवडणुका थांबवणार का? हा निर्णय बदलण्याचे कारण काय?’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या टीकेला राज्य सरकारकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here