ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विभागीय चौकशीत त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जवळपास चौतीस महिने कामावर हजर न राहता त्यांनी शासनाकडून पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. त्यांच्यावरील कारवाई अटळ असताना आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आपली बाजू त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यानंतर डिसले गुरुजींवर अन्याय होईल असं पाऊल उचलणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
गुरुजींवर अन्याय होईल, असं पाऊल राज्य शासन उचलणार नाही
डिसले गुरुजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला भेटले आहेत. सीएम साहेबांनी गुरुजींचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. डिसले गुरुजींची बाजू ऐकून घेतल्यानंतर आवश्यक ते निर्देश दिले आहेत. दरम्यान त्यांच्यावर अन्याय होईल, असं पाऊल राज्य शासन उचलणार नाही, अशी शाश्वती फडणवीसांनी डिसले गुरुजींना दिली.
‘योग्य’ आदेश दिलेत
ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, ज्याने भारताची ख्याती सर्वदूर पसरवलीये, त्यांच्याबाबतीत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, यादृष्टीने योग्य आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, असं फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
गुरुजींकडून ३४ महिन्यांचा पगार वसूल होणार
ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच राजीनामा पूर्व नोटीस दिली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कारवाई होण्याअगोदर रणजितसिंह डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. जवळपास चौतीस महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माहिती दिली.