dead mosquito helps police: चीनच्या फुजियान प्रांतातील फुजो शहरात एक चक्रावून टाकणारी घटना घडली. एका घरात चोरी झाली. त्या चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांना एका डासाची मदत झाली.

एका रहिवासी इमारतीत चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घर बराच काळापासून बंद होते. त्यामुळे चोर बाल्कनीतूनच घरात शिरला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. घराच्या स्वयंपाकघरात उकडलेली अंडी, शिल्लक राहिलेले न्यूडल्स पोलिसांना दिसले. बेडरूममधील बिछान्यावर पांघरूण पडलेलं होतं.
चोरी केल्यानंतर चोर काही वेळ घरात थांबला. मग चोरीचं सामान घेऊन तो पसार झाला याची खात्री पोलिसांना पटली. याचवेळी पोलिसांचं लक्ष भिंतीवर असलेल्या डासाकडे गेलं. डास मेलेला होता. त्याचं रक्त भिंतीवर लागलं होतं. भिंतीवर पोलिसांना रक्ताचे काही थेंब दिसले.
भिंतीवरील रक्ताच्या थेंबांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. हा डीएनए एका गुन्हेगाराशी जुळला. त्या गुन्हेगाराच्या नावावर बरेच गुन्हे दाखल होते. या गुन्हेगाराचा माग काढून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आपण एकूण ३ घरांमध्ये चोरी केल्याची कबुली त्यानं चौकशीत दिली. पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network