मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी नगरसेवकांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बदलापुरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनीही सर्व नगरसेवकांचं शिंदे गटात स्वागत केलं. आपल्या समर्थनाबद्दल आभारी आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीचं काम आपल्या हातून घडेल, अशी ग्वाही त्यांनी शिवसैनिकांना दिली.
शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आपल्या समर्थक २५ नगरसेवकांसह शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. आमच्या प्रश्नांकडे आणि मागण्यांकडे आपण जातीने लक्ष द्याल, हा विश्वास वाटत असल्याने आम्ही आपणास पाठिंबा देत असल्याचं २५ नगरसेवकांच्या वतीने वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही मान डोलावून म्हात्रे यांच्या म्हणण्याला समर्थन दिलं.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेतील ३३ नगरसेवक, मिरा भाईंदर महानगरपालिकेतील १२ नगरसेवक, उल्हासनगर महापालिकेतील १५ नगरसेवक,
वसई – विरार मनपातील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी आणि अंबरनाथ नगर परिषदेतील २० नगरसेवकांच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांचं मुंबई उपनगरांमधील ‘राजकीय वजन’ वाढलं आहे.
पाठिंबा देणाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-एकनाथ शिंदे
“आम्ही घेतलेली हिंदुत्वाची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली आहे. युतीचं सरकार सर्वसामान्यांसाठी, गोरगरिब कष्टकऱ्यांसाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतंय. हाच विश्वास ठेवून गेली १० दिवस राज्यभरातून आम्हाला पाठिंबा मिळतो आहे. पाठिंबा देणाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, त्यांच्या प्रश्नाकडे आणि मागण्यांकडे आम्ही जातीने लक्ष देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.