नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपनं मिशन २०२४ हाती घेतलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांवर १४१ जागांची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत हे मंत्री त्यांना देण्यात आलेल्या मतदारसंघांत जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि रणनीती आखतील. २०१९ मध्ये भाजपचा १४ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. या जागा जिंकण्यासाठी भाजपनं चार समूह तयार केले आहेत. या १४ मतदारसंघात सध्या समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसचे खासदार आहेत.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे बुलढाणा आणि औरंगाबाद मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९९९ पासून बुलढाण्यात शिवसेनेचा खासदार राहिला आहे. सध्या खासदार असलेले प्रतापराव जाधव २००९ पासून निवडून येत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी सव्वा लाखाहून अधिकच्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे.
शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची तयारी; सीतारामन यांच्याकडे मोठी जबाबदारी
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सध्या एमआयएमकडे आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा जवळपास साडे चार हजार मतांनी पराभव केला. त्याआधी २००४ ते २०१९ पर्यंत खैरे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते. १९८९ ते १९९६ या कालावधीत शिवसेनेचे मोरेश्वर सावे या मतदारसंघाचे खासदार होते. १९९६ मध्ये सेनेचेच प्रदीप जयस्वाल इथून विजयी झाले. त्यामुळे या मतदारसंघात सेनेचं प्राबल्य आहे.
जो गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, संतोष बांगरांच्या तोंडी हिंसेची भाषा
भूपेंद्र यादव कोण आहेत?
राज्यसभेचे खासदार असलेले भूपेंद्र यादव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खास मर्जीतले मानले जातात. गेल्याच महिन्यात राज्यात सत्तांतर झालं. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत वाटाघाटी करण्यात यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली होती. ते निवडणूक प्रभारी होते. राज्यात भाजपनं १०५ जागा जिंकल्या. त्यात यादव यांचा मोठा वाटा होता. निवडणूक चाणक्य अशी त्यांची ओळख आहे. राजस्थान (२०१३), झारखंड (२०१४), गुजरात (२०१७) या विधानसभा निवडणुकांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here