मुंबई : आधीच तुटपुंजा पगार व मर्यादित निवृत्त लाभ मिळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शेकडो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. एसटी महामंडळातील शिपाई ते अधिकारी पदापर्यंतच्या दीडशे ते दोनशे जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची कमाई लुटण्यात आली आहे. याप्रकरणी गुंतवणूक कंपनीच्या दोन भागीदारांना भाईंदरमध्ये अटक करण्यात आली असून, लुटीचा आकडा ५० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील संगणक विभागामध्ये ३४ वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर निवृत्त झालेले नारायण निलवे (६९) यांची सन २०१८मध्ये भाईंदर येथील अण्णा अमृते याच्याशी ओळख झाली. अमृते याने आपण १५ वर्षांपासून शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करीत असल्याचे निलवे यांना सांगितले. बँकेत ठेवलेल्या रकमेवर व्याज कमी मिळत असल्याने निलवे यांनी शेअर्स गुंतवणुकीमध्ये रस घेतला. अमृते याने गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना सांगितल्यानंतर निलवे यांनी दोन लाख रुपये गुंतवले. दरमहा त्यांना या गुंतवणुकीवर दहा हजार रुपये मिळू लागले. विश्वास बसल्याने त्यांनी आणखी तीन लाख रुपये गुंतविले. यानंतरही काही महिने नियमित परतावा मिळत असल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावेही पैसे गुंतविले. मात्र काही कालावधीनंतर परतावा मिळणे बंद झाले आणि अमृते यांच्याकडूनही चालढकल होत असल्याने निलवे यांनी पोलिसांत धाव घेतली.

उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढणार आरपारची लढाई; महाराष्ट्र पिंजून काढणार

अण्णा अमृते आणि त्याचा भागीदार कुलदीप रुंगटा यांचे कार्यालय भाईंदरला असल्याने याप्रकरणात भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासामध्ये एजी सिक्युरिटीज, केके सिक्युरिटीज आणि एए सिक्युरिटीज या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली या दोघांनी सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे अमृते आणि गुन्हा दाखल होताच पळालेल्या रुंगटा याला अटक करण्यात आली. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी सांगितले.

आयुष्यभराच्या कमाईवर पाणी

फसवणूक झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्त आहे. ३० ते ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ एसटीमध्ये नोकरी केल्यानंतर हे निवृत्त झाले. निवृत्तीच्या वेळी मिळालेली रक्कम बँकेत ठेवूनही अधिक व्याज मिळत नसल्याने अनेकांनी आपल्या कष्टाची कमाई अमृते आणि रुंगटा यांच्या कंपनीमध्ये गुंतवली. ही रक्कम परत मिळण्याची शक्यता धूसर असल्याने सर्वस्व हरपल्याची भावना या ज्येष्ठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here