कोल्हापूर : शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. आज याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील याच मार्गावर असल्याचे समजते.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेने भगवा फडकवताना मंडलिक आणि माने यांना निवडून दिले. कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेवर सेनेचा झेंडा फडकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पाठोपाठ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सहभागी झाले. त्यानंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांची नावे चर्चेत येऊ लागली, पण दोघांनीही आपण शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली.

संजय मंडलिक यांनी चार दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता जे राहिले ते अस्सल सोनं आहे, असं म्हणत आपण शिवसेना सोडणार नाही अशी घोषणाच केली. पण त्यानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला आणि कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारली. दुसरीकडे, धैर्यशील माने मातोश्रीला गेले मात्र कोल्हापूरच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार अशी चर्चा जोरात सुरू झाली. त्यामध्ये आता मंडलिक यांचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

‘त्या’ बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी? निलेश राणेंचा विनायक राऊतांना सवाल

राज्यातील बहुसंख्य खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने आपण तरी कशाला सेनेत राहायचे या मानसिकतेत मंडलिक असल्याचे समजते. सत्तेबरोबर जाऊन विकास करण्यासाठी त्यांनी आता शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दुपारी कागल तालुक्यात हमीदवाडा येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन आहे. या मेळाव्यात कार्यकर्ते त्यांना शिंदे गटात जाण्याचा आग्रह करतील आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आपण शिंदे गटात जात असल्याचे मंडलिक घोषणा करतील अशी शक्यता आहे.

उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढणार आरपारची लढाई; महाराष्ट्र पिंजून काढणार

शिंदे गटात गेल्यास संजय मंडलिक यांना लोकसभेची भाजप आणि शिंदे गटाची उमेदवारी सहज मिळू शकते. कारण या गटाचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडून गेल्याने सध्या भाजपकडे उमेदवारच नाही. मंडलिक उमेदवार झाल्यास त्यांना भाजपची तसंच प्रकाश अबीटकर, समरजीत घाटगे, चंद्रदीप नरके, राजेश पाटील अशा अनेकांची ताकद मिळू शकते. यातून त्यांची उमेदवारी प्रबळ होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातून निवडून आलेले धैर्यशील मानेही याच विचारात असल्याची चर्चा आहे. पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दुजोरा मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here