मुंबई: शूटिंगसाठी प्रवास करणं हे काही कलाकारांना नवीन नाही. सिनेमाचं शेड्यूल, नाटकांच्या प्रयोगाचं वेळापत्रक, मालिकांचा कॉलटाइम यावर कसरत करत कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचावच लागतं. मालिकांमधून तर मोठी सुटी मिळणं मुश्कील आणि मिळालीच तर कधी कॉल टाइम येईल हे काही सांगता येत नाही. शो मस्ट गो ऑन हे सूत्र तर कलाकारांना जपावच लागतं.

आता हे सगळं आपण कुणाविषयी बोलतोय असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? तर हा अनुभव शेअर केला आहे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील विश्वजित काका म्हणजेच अभिनेता आनंद काळे याने. तो सध्या लेह लडाख येथे बाइक टूरवर गेला आहे.

पण मालिकेचा ठरलेला कॉलटाइम पूर्ण करण्यासाठी पठ्ठ्यानं लेह ते मुंबई प्रवास केला, सीन दिला आणि पुन्हा त्याच्या ड्रीम बाइक टूरवर लेहला पोहोचला. कामात हलगर्जीपणा नाही अशी कॅप्शन देत त्याने या प्रवासाचं वर्णन शेअर केलं आहे.

आनंदने सोशल मीडियावर पोस्ट करत दिलेल्या माहितीत त्याने लेह ते लडाख प्रवासानंतर पुन्हा लेह ते मुंबई प्रवास करून शूटिंग केलं आणि पुन्हा त्याने लेहमध्ये जाऊन त्याच्या बाइकग्रुपला कसं गाठलं याचा थरारक अनुभव शेअर केला आहे. आनंदने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लेहला जाण्यापूर्वी हातातलं सगळं काम, शूटिंग पूर्ण केलं. १३ आणि १४ जुलैला माझी तुझी रेशीगाठ मालिकेच्या शूटिंगचा कॉल १२ तारखेला मिळाला. तडक पाकिस्तान बॉर्डरवरच्या थांग गावातून बाइकवरून लेहपर्यंत आलो. तिथून विमानाने मुंबई गाठली, शूट केलं आणि पुन्हा विमानाने लेहला पोहोचलो. पार्क केलेली बाइक काढली आणि १० तास राइड करून ग्रुपला जॉईन झालो.

हे वाचा-

आनंदने लिहिलेला हा अनुभव वाचून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. तर हे लिहिण्याचं कारण आनंदने सांगितलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून २१ दिवस कसा सुट्टी घेऊ शकतो यावरून त्याला खूपजण प्रश्न विचारत होते. पण अभिनय, कामाशी प्रामाणिकपणा या गोष्टी एकीकडे आणि छंद, आवडीनिवडी एकीकडे . मी यामध्ये समतोल साधत माझं काम करतो, कारण शो मस्ट गो ऑन असं आनंदने सांगितलं.

विश्वजित काका मालिकेतून ब्रेक घेणार. लेह लडाखला बाइक टूर करण्यासाठी तो मोठी सुट्टी घेणार या बातम्यांची खूप चर्चा झाली. आनंद काळे मालिका सोडणार अशाही वावड्या उठल्या. पण काम हे काम आहे आणि छंद हे छंद आहेत असं म्हणत काम पूर्ण करण्यासाठी आनंद काळे काहीही करू शकतो हेच त्यानं दाखवून दिलं.

बाइकवरून लेहलडाखला जाण्याचं स्वप्नं आनंद गेल्या कित्येक दिवसांपासून पाहत होता. ते स्पप्नं पूर्ण करण्यासाठी २ जुलैला आनंद कोल्हापूरमधून लेहच्या दिशेने निघाला. त्याने ठरलेलं शूटिंग पूर्ण केलं होतं, पण काही कारणाने तारखा पुढे गेल्या आणि जेव्हा तो लेहला पोहोचला तेव्हा त्याला शूटिंगसाठी कॉल आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here