मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्या टप्प्यात आमदार प्रकाश अबिटकर वगळता कुणीच या बंडात सहभागी होणार नाही अशी चर्चा सुरू झाली. पण ज्या पक्षाने राज्यमंत्री केले ते राजेंद्र यड्रावकर गुवाहाटीला पोहोचले. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची आमदारकीची पाटी कोरी झाली. नंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही शिंदे यांना साथ देत गुवाहाटी गाठले. या सर्वांच्या विरोधात आंदोलन सुरु असतानाच खासदार संजय मंडलिक यांनीही कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे सांगत सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. आता दुसरे खासदार धैर्यशील मानेही त्याच वाटेवर आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडले असतानाच आता पदाधिकारीही हळूहळू बंडाच्या तयारीत आहेत. आंदोलनात आणि मेळाव्यात सहभागी होणारे एक जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. कोणत्याही क्षणी ते बंडाचा झेंडा फडकवत शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे. पंधरा दिवस सेनेच्या कोणत्याच आंदोलनात अथवा मेळाव्यात हजेरी न लावणारे माजी आमदार चंद्रदीप नरके ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. ज्यांच्या विरोधात लढले, त्यांच्या सोबत राहण्याचा अडीच वर्षे त्रास होत असल्याची त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या आगामी भुमिकेबाबत स्पष्टता दाखवते. आज ते ना शिवसेनेसोबत आहेत ना शिंदे गटासोबत. पण त्यांची आगामी पावले निश्चितपणे शिंदे गट अथवा थेट भाजपबरोबरच पडण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या एका आमदाराचंही बंड?
राज्यात काँग्रेसचे पंधरा ते वीस आमदार फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील एका आमदाराचा देखील समावेश आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतच त्यांनी शिंदे गटाला ‘हात’ देण्यास संमती दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बंडखोरीचा झेंडा सर्व आमदारांनी एकाचवेळी फडकविण्याचा निर्णय घेतल्याने सध्या राज्यातील त्या सर्व आमदारांची नावे गुपित ठेवण्यात आली आहेत.