रीनाने पाचवर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. पतीचे नाव करण सिंह असं आहे. प्रेमविवाहानंतर तिचा पती करण तिला मारहाण करायचा. तसेच पतीच्या दुसऱ्या तरूणीशी असलेल्या संबंधांमुळेही रीना मानसिक तणावात होती. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. तिने तिच्या बहिणीला ऑडिओ पाठवून घरात गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेनंतर रीनाची बहिण आणि वडील यांनी रीनाचा पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत तक्रार दाखल केली आहे.
मृत रीना हिची बहीण शालिनी हिने सांगितले की, ५ वर्षांपूर्वी तिची मोठी बहीण रीना हिने कोटा येथील रहिवासी करण सिंहसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर एकदाही सासरच्यांनी रीनाला माहेरी पाठवले नाही. अनेकवेळा फोन करून रीनाला घरी आणण्यास सांगितले. मात्र, सासरच्यांनी याकडे दुर्लक्ष केले. बहिणीचे म्हणणे आहे की, रीनाने मृत्यूपूर्वी ऑडिओ क्लिप पाठवली. यामध्ये तिने तिच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचं सांगितलं होतं.
तसेच त्याला आता रीनासोबत राहायचं नव्हतं आणि पुजा नावाच्या एका तरूणीसोबत त्याला पुढचे आयुष्य जगायचं होतं. रीनाचा पती करण सिंहने तिला अनेकवेळा मारहाण देखील केली. तसेच हुंड्यासाठी तिचा छळ देखील केला. त्याचवेळी वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत.