लंडन : हार्दिक पंड्या एकहाती सामना कसा जिंकवून देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या सामन्यात पाहायला मिळाले. कारण संघाला विकेट्सची गरज असताना हार्दिकच धावून आला. त्यानंतर भारताचे चार फलंदाज बाद झाल्यावर संघाला सावरण्याचे काम यावेळी हार्दिक पंड्यानेच केले. हार्दिकने या सामन्यात चार बळींसह झुंजार अर्धशतकही झळकावले. त्यामुळेच भारताला इंग्लंडला तिसऱ्या वनडे सामन्यात पाच विकेट्स राखून पराभूत करण्यात आले. या विजयासह भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. हार्दिकने ५५ चेंडूंत १० चौकारांच्या जोरावर ७१ धावांची वादळी खेळी साकारली. पंतने यावेळी शतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय संघाला मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात दोन बळी मिळवत चांगली सुरुात करून दिली होती. पण त्यानंतर जेव्हा संघाला विकेट्सची गरज होती तेव्हा हार्दिकच संघासाठी धावून आला. हार्दिक पंड्याने प्रथम जेसन रॉयला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. रॉयने यावेळी ४१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिकने बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का दिला, हार्दिक पंड्याने त्याला २७ धावांवर बाद केले. इंग्लंडने पहिल्या २५ षटकांमध्ये चार विकेट्स गमावले. त्यामुळे २५ षटकांनंतर इंग्लंडची ४ बाद १३१ अशी स्थिती होती. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांच्यामध्ये चांगली भागीदारी होत असल्याचे पाहायला मिळत होते. पण यावेळी पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला तो हार्दिक पंड्या. कारण हार्दिक पंड्याने यावेळी दोघांनाही बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. लिव्हिंगस्टोनच्या रुपात इंग्लंडला यावेळी सहावा धक्का बसला. त्याला २७ धावा करता आल्या. भारताने अर्धशतकवीर जोस बटलरला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. बटलरने यावेळी तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६० धावा केल्या. हार्दिकने मोक्याच्या क्षणी भारताला या विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर फलंदाजीतही हार्दिकने भारताला सावरले.
इंग्लंडच्या २६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन एका धावेवर बाद झाला, तर रोहित शर्मा १७ धावांत तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आण सूर्यकुमार यादव हे दोघेही लवकर बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक संघासाठी धावून आला. हार्दिक आणि रिषभ पंत या दोघांनी यावेळी अर्धशतकी खेळी साकारली आणि भारताला विजयासमीप नेऊन ठेवले.