परभणी : नदीकाठी असलेली मोटार पुराच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून मोटार काढण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्याचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. शंकर तातेराव कदम असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शंकर कदम हे शुक्रवार १५ जुलै रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर आज चौथ्या दिवशी कदम यांचा मृतदेह हाती लागला आहे.

पूर्णा शहरातील स्वस्तिक नगर भागात राहणारे शेतकरी शंकर कदम यांची कौडगाव रस्त्यावर पूर्णा नदीकाठी गट क्रमांक ४९ मध्ये शेतजमीन आहे. शेतीला पाणी देण्यासाठी त्यांनी नदी काठावर मोटार बसवली होती. जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात आपली मोटार वाहून जाऊ नये म्हणून ती काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी शंकर कदम हे शेताकडे गेले होते. दुपारपर्यंत ते घरी न आल्याने मुलगा गणेश कदम, पुतण्या रवी कदम यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते आढळून आले नाहीत.

Shivsena: शिवसेनेचा पाय आणखी खोलात, नव्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांचेही अवघ्या काही तासांत राजीनामे

नदीवरील मोटारीजवळ शंकर कदम यांची चप्पल आणि रुमाल दिसून आला. त्यामुळे ते नदीच्या पुरात वाहून गेल्याचा संशय आल्याने नातेवाईकांकडून नदीपात्रात शोध घेण्यात आला. तसंच घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि गणेश रापतवार यांच्या नेतृत्वात मो. अमजद, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी, महेश रापतवार, तुषार परसोडे, शरद बुरड, राहुल राजभोज, शेख अरबाज, राजेश चावरीया, आदित्य वाढवे यांच्या पथकाने नदीपात्रात शोध घेतला.

१९४७ साली घर सोडले…; पुण्यातील आजींनी ७५ वर्षांनी रावळपिंडीतील घराला दिली भेट

दरम्यान, आज सकाळच्या सुमारास शेतकरी कदम यांचा मृतदेह रेल्वे पुलाच्या खांबाजवळ तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी रवी रमेशराव कदम यांच्या खबरीवरुन पूर्णा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असं कुटुंब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here