आज नव्याने सापडलेला करोना रुग्ण आंबा वाहतुकीशी संबंधित आहे. सदर रुग्ण हा २६ एप्रिल रोजी मुंबई येथे गेला होता तर दिनांक २७ एप्रिल रोजी मुंबईहून तो परत आला. त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉट मधून आल्यामुळे त्याचा २ मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
दरम्यान, ऑरेंज झोनमध्ये असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्याच आठवड्यात करोनामुक्त झाला होता. त्यानंतर मुंबईतून गावी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यानंतर आता आणखी एक करोना रुग्ण आढळल्याने व त्याचं मुंबई प्रवासाचं कनेक्शन असल्याने सारेच हादरले आहेत. करोनासाठी रेड झोन असलेल्या मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या सर्वच व्यक्तींवर प्रशासनाची आता करडी नजर असणार आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines