ceo, पोलिओग्रस्त असूनही CEO पोहोचले दुर्गम भागातील धनगरवाड्यात; ‘त्या’ व्हिडीओची घेतली दखल – ceo of zilla parishad visited dhangarwada in ajara district
कोल्हापूर: मुसळधार पाऊस असतानाही ओढ्यातून वाट काढत जाणाऱ्या आरोग्यसेविकांची बातमी महाराष्ट्र टाईम्सनं प्रसिद्ध केली होती. आजरा तालुक्यातील धनगरवाड्यात असलेल्या लहान मुलांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी जात असलेल्या आरोग्यसेविकांचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सनं दिलं होतं. अतिशय अवघड मार्गातून वाट काढत आरोग्यसेविका त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी जात होत्या. आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा जपणाऱ्या आरोग्यसेविकांची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी घेतली. चव्हाण यांनी धनगरवाड्याला भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
आजरा तालुक्यातील धनगरवाड्याला जाण्यासाठी असलेला चांगल्या स्थितीत नाही. पावसाच्या दिवसांत त्रास आणखी वाढतो. काही दिवसांपूर्वी आरोग्य सेविकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा धनगरवाडा प्रकाशझोतात आला. यानंतर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सिंह चव्हाण यांनी या वाड्याला भेट देण्याचे ठरवले आणि ते रविवारी वाड्याला भेट देण्यासाठी तिथे पोहोचले. भाजपाच्या श्रीकांत देशमुखांचा पाय खोलात; नैसर्गिक, अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल संजयसिंह चव्हाण यांना लहानपणीच पोलिओ झाल्यानं त्यांचा एक पाय थोडा अधू आहे. त्यामुळे ते काहीसे लंगडत चालतात. चव्हाण यांच्या व्यंगाची कल्पना असल्यानं ते डोंगर चढून धनगरवाड्यावर काय जाणार असं सोबतच्या अधिकाऱ्यांना वाटलं. मात्र त्यांनी हातात एक काठी घेवून निसरड्या आणि पावसाने तयार झालेल्या चिखलातून हळूहळू वाट काढत धनगरवाडा गाठला. तेथे पोहोचताच त्यांना पाऊसामुळे एक म्हैस मेलेली आणि तिला दोन जण ओढत घेऊन चाललेले विदारक दृश्य दिसले. त्यांनी त्यांची विचारपूस केली आणि पंचनामा करण्याचे आदेश दिले. वाड्यावर पोहोचताच अधिकारी आलेले पाहून वाड्यावरील नागरिकांनी आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली.
वाड्यावर राहणाऱ्या लोकांच्या व्यथा संजय सिंह चव्हाण यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करू असं आश्वासन दिलं. पहिल्यांदाच कोणा मोठ्या अधिकाऱ्यानं आपली दखल घेतल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.