GST tax hike | स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या दही, ताक, पनीर, पॅकबंद पीठ, साखर, तांदूळ, गहू, मोहरी, जव आदी वस्तूवर प्रथमच पाच टक्के जीएसटी लादण्यात आला आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्याबरोबरच गोरगरीब व कष्टकरी लोक ‘भत्ता’ म्हणून जो चिवडा किंवा मुरमुरे खातात त्यावरही पाच टक्के जीएसटी (GST) लावण्यात आला आहे.

हायलाइट्स:
- ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले
- जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवताना ‘जना’ची नाही, पण ‘मना’ची नाही
- मोदी यांनीच जीवनावश्यक वस्तूना जीएसटी लागणार नाही, असे जाहीर केले होते
सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला नेऊन भिडवल्यानंतर मोदी सरकारने ‘किचन’मधील महत्त्वाच्या वस्तूंवर ‘जीएसटी’चा हल्ला चढवला आहे. सोमवारपासून सरकारने ज्या अनेक नव्या वस्तूंना जीएसटीच्या जाळ्यात ओढले, ते पाहता गोरगरीब व मध्यमवर्गीयांचे पुरते कंबरडेच मोडायचे असा निश्चय दिल्लीश्वरांनी केलेला दिसतो. स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या दही, ताक, पनीर, पॅकबंद पीठ, साखर, तांदूळ, गहू, मोहरी, जव आदी वस्तूवर प्रथमच पाच टक्के जीएसटी लादण्यात आला आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्याबरोबरच गोरगरीब व कष्टकरी लोक ‘भत्ता’ म्हणून जो चिवडा किंवा मुरमुरे खातात त्यावरही पाच टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. गहू, तांदूळ, पीठ, दही, ताक, पनीर यांसारख्या रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तू आधीच गेल्या आठेक वर्षात महागल्या असताना त्यावर आणखी जीएसटीचा घाव घालून सरकारने नेमके काय साधले? ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले; पण हs स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्यांनी किमान जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवताना ‘जना’ची नाही, पण ‘मना’ची तरी बाळगायला हवी होती, अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर प्रहार केला आहे.
पंतप्रधान मोदींनी शब्द फिरवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कायद्यासंदर्भात दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पाच वर्षांपूर्वी जेव्हा सोपी करप्रणाली म्हणून सरकारने जीएसटी अस्तित्वात आणला, तेव्हा त्याचे गोडवे गाताना खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जीवनावश्यक वस्तूना जीएसटी लागणार नाही, असे जाहीर केले होते. गहू, तांदूळ, दही, लस्सी, ताक या वस्तूंवर पूर्वी टॅक्स लागत होता. पण आता जीएसटी आल्यावर मात्र या सर्व वस्तू टॅक्स फ्री असतील, असे पंतप्रधान मोदी यांनी एका भाषणात निक्षून सांगितले होते. या प्रत्येक वस्तूवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय आज त्यांच्याच सरकारने घेतल्याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. तसेच पंतप्रधान मोदी जनतेला गृहीत धरत असल्याची टीकाही शिवेसनेने केली. सामान्य जनतेच्या हितांकडे डोळेझाक करून मनमानी राज्यकारभार केला तर काय होते याचे ताजे उदाहरण श्रीलंकेच्या रूपाने साऱ्या जगासमोर आहे, असा इशाराही ‘सामना’तील अग्रलेखातून देण्यात आला आहे
‘मोदींनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला अन् गोरगरीब जनतेच्या अन्नधान्यावर GST लादला’
तीन वर्षापूर्वी याच सरकारने अचानक देशातील उद्योजकांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी केला होता. त्यामुळे वर्षाला दीड लाख कोटीचा फटका सरकारी तिजोरीला बसेल असे याच अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. म्हणजे या हिशेबाने एकीकडे गेल्या तीन वर्षांत श्रीमत उद्योजकाना तुम्ही साडेचार लाख कोटींच्या करसवलतीची खिरापत वाटता, आणि दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या अन्नधान्यावर व दह्यावर जीएसटी लादून ते महाग करता, हा कुठला कारभार म्हणायचा? म्हणजे श्रीमतांवर उधळण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे. पण गरीबांना सवलत देण्यासाठी नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : shivsena slams modi govt over gst tax hike on essential items healthcare
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network