नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदारांनंतर लोकसभेतील खासदारांकडून बंड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच आपल्याबरोबर असलेल्या खासदारांचा गट एनडीएसोबत असल्याची माहिती या बैठकीत शिंदे देणार असल्याचे समजते. दिल्लीत पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शिवसेना खासदारांच्या बंडाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही भाष्य केलं आहे.

‘शिवसेनेचे खासदार लवकरच आम्हाला भेटतील. आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार आहेत,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्वच्या सर्व खासदार आपल्यासोबत असल्याची तिरकस प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मात्र यातील सहा खासदार अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सहा खासदारांपैकीही काही खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी; आत्महत्या रोखण्यासाठी गृह विभागाचा अजब निर्णय

ओबीसी आरक्षणविषयक चर्चेसाठी दिल्लीत

‘ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात होत असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मी दिल्लीत आलो आहे. राज्यातील ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने याबाबतीत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

येत्या पाच दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

शिवसेनेचे खासदार आजच बंडाचा झेंडा फडकवणार?

राष्ट्रपतिपदाच्या मतदानानंतर शिंदे गटाची सोमवारी ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी हजेरी लावल्याचे समजते. बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गटनेते पदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दिल्यास मंगळवारीच लोकसभेत यासंदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्यांच्याकडून तूर्तास थांबण्याचा सल्ला दिल्यास त्याप्रमाणे खासदारांबाबत पुढील दिशा ठरवली जाईल. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचावरील सुनावणी बुधवारी घटनापीठासमोर होणार असून दिल्लीसाठी रवाना झालेले शिंदे या दौऱ्यादरम्यान कायदेशीर बाजूंचे मार्गदर्शनही घेणार असल्याचे कळते. मंगळवारी रात्री उशिरा ते राज्यात परतणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here