सौरभ बेंडाळे| नाशिक : शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे. सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने प्रहार केला. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सध्या कोकणे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, बाळा कोकणे यांच्यावरील हल्ल्यासह शहरातील इतर राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर शालिमार येथील शिवसेना कार्यालय, खासदार निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.