कोल्हापूर : शिवसेना आमदारांमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षाचे लोकसभेतील खासदारही बंडखोर गटात सामील होत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर जिल्ह्यातील दुसरे खासदार धैर्यशील मानेही त्याच वाटेवर आहेत. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र या पत्रकार परिषदेआधीच खासदार माने यांची कार्यकर्त्यासोबत फोनवर संवाद साधतानाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा कल असल्याचं स्पष्ट झालं आहे.

धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यासोबत झालेल्या संवादात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये खासदार माने आपल्या कार्यकर्त्याला सांगत आहेत की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष संपावा आणि दोन्ही नेते पुन्हा एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. मात्र आता काही गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. नेतृत्व जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागत आहे. आपण सध्या परिस्थितीचा बळी झालो आहोत. अशी परिस्थिती कोणाच्याही राजकीय आयुष्यात येऊ नये. मात्र आपल्याला आता प्रवाहासोबत जावं लागणार आहे,’ असं माने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

Ramdas Kadam: ‘जे आदित्य ठाकरे मला ‘काका-काका’ बोलायचे, ते माझंच खातं घेतील, असं वाटलं नव्हतं’

‘माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत, पण…’

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मातोश्रीवर पोहोचलेल्या काही मोजक्या खासदारांमध्ये धैर्यशील माने यांचाही समावेश होते. खासदार माने हे वारंवार उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कमपणे मांडत असल्याचं याआधी अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीत ते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. ‘मी कधीही छक्के पंजे करून राजकारण केलं नाही. कधी पैशाच्याही मागे लागलो नाही, जे समोर येत गेलं ते करत राहिलो. माझा भावनिक संबंध हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत खूप आहे. मात्र मी शिवसेना सोडत नाही, शिवसेना ही अंतर्गत वेगळी झालेली आहे. मी जरी शिंदे गटासोबत गेलो तरी मी शिवसेना सोडली असा अर्थ होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या कामांना न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. एवढ्या राजकीय घडामोडी होत असताना देखील एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये बसून आपल्या मतदारसंघातील एका फाईलवर सही केली. मागील दोन ते तीन वर्षात चांगले असे काही घडलेले नाही. अनेक कामे करताना मर्यादा आल्या आहेत. आमदारांसारखी नाराजी खासदारांमध्येही आहे. आमदारांना निधी कमी मिळाला असे आमदार म्हणत आहेत. मात्र खासदारांना निधीच मिळाला नाही. केंद्राचा निधी हे बंद झाला आणि राज्य शासनाने ही खासदारांना काही मदत केली नाही,’ अशा शब्दांत धैर्यशील माने हे आपली नाराजी व्यक्त करत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे.

जीएसटी वाढला अन् चोरट्यांनी डाव साधला; जालन्यातील प्रकार पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल

दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here