मिळालेल्या माहितीनुसार ,अखिल पवार हे कुटुंबीयासह त्यांच्या दोन वर्षांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १३ जुलै रोजी लोणावळ्यात आले होते. त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली येथील पुष्पा व्हिला बुक केले होते. येथे आल्यावर पवार कुटुंबीय व्हिलामधील हॉलमध्ये मुलांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करत होते. यावेळी शिवबा हा खेळता खेळता बाहेर आला आणि जवळच असलेल्या जलतरण तलावात पडून बुडाला.
काही वेळानंतर शिवबा जवळ कुठेच दिसत नाही म्हणून त्याच्या आई-वडील व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, पण तो आढळला नाही. अखेर कुटुंबातील सदस्य जलतरण तलावाजवळ आले असता, त्यांना शिवबा पाण्यात बुडाल्याचं लक्षात आलं. नातेवाईकांनी तत्काळ शिवबाला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, बुधवारी घडलेली ही घटना आज उघडकीस आली असून या घटनेबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहे.