एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालंय. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. काल शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला आढळराव पाटलांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. त्यानंतर आज तातडीने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आपल्या व्यथा मांडताना आढळराव पाटलांनी १५ दिवसांपूर्वीचा उद्धव ठाकरेंसोबतचा प्रसंग सांगितला.
उद्धव ठाकरे आढळरावांना म्हणाले, पवारांना सोडून आपल्याला चालायचं नाही!
“माझी हकालपट्टी झाल्याचं सामनात छापून आलं. नंतर चुकीने हकालपट्टी झाल्याचं उद्धव ठाकरे, विनायक राऊत, अरविंद सावंत यांनी फोन करुन कळवलं. त्यानंतर मी आणि शरद सोनवणे उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमची सखोल चर्चा झाली. इथून पुढची पावलं काय असावीत, आता काय नियोजन असलं पाहिजे, कसं प्लॅनिंग केलं पाहिजे? यावर विस्तृत चर्चा झाली. चर्चेच्या शेवटाला शरद सोनावणे उद्धव ठाकरेंना म्हणाले, साहेब एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार राष्ट्रवादीला कंटाळून आपल्याला सोडून निघून गेलेत. आता आपण झालं गेलं विसरुन जाऊयात… आपली ताकद आपण आजमावुयात.. पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरु. आपण स्वबळावर विधानसभेच्या २८८ जागा लढू. आम्ही पडलो तरी बेहत्तर… पुन्हा कधी निवडून येऊ.. पण फक्त राष्ट्रवादीशी असलेली आघाडी तोडा… शरद सोनावणे यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, शरदजी हे शक्य नाही होणार, पवारांना सोडून आपल्याला चालायचं नाही”, असं आढळराव पाटील यांनी सांगितलं.
शरद पवारांनी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर युती केली त्या पक्षाला संपवलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण आता जायला नको. आपण आपलं स्वबळावर लढू केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्या मागे काही नाही. पण आपल्यामागे तर बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत, असंही शरद सोनावणे आणि मी उद्धव ठाकरेंना म्हणालो. पण उद्धव ठाकरेंनी पवारांशी आघाडी तोडायला नकार दिला, असं आढळराव पाटलांनी सांगितलं.