मुंबई : शिवसेनेत फूट ही बंडखोरांनी पाडली नाही तर भाजपने पाडली आहे. भाजपच सेनेला संपवत आहे, असा हल्लाबोल करत माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. ठाकरे संकटाला घाबरत नाहीत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करु, पुन्हा पक्ष नव्याने उभा करु, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत असल्याची भावना व्यक्त केली. सध्या शिवसेनेचा कठीण काळ सुरु आहे. भगव्याचे निष्ठावंत शिलेदार एक एक करुन तुमची साथ सोडत आहेत. पण या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे आम्ही पदाधिकारी तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.

उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत भाजप आणि शिंदे गटावर बाण सोडले. ते म्हणाले, “माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा. शिवसेनेत फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली. भाजपच सेनेला संपवत आहे.

राणेंशी दंगा-काँग्रेस राष्ट्रवादीशी पंगा, भगव्यासाठी कायपण, भाईंनी सेना का सोडली? ५ मोठी कारणे
“भाजप दोन कोंबड्यामध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे.संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हे ही दिवस जातील, तोपर्यंत मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु”, असा प्रण उद्धव ठाकरे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here