राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वरचेवर वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. राजधानी नवी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तत्पूर्वी शिंदे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. नव्या गटनेते पदाच्या नियुक्तीसाठी पत्र देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतु शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. मुख्य प्रतोद यांच्या नावाने पत्र द्या असं लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाला सांगितल्याची माहिती आहे. दुसरीकडे लोकसभेत गटनेते विनायक राऊत शिंदे गटासोबत नाहीयेत त्यामुळे राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत.
शिवसेनेचा आपलाच गट अधिकृत आहे, हे सांगण्यासाठी शिंदे गटातल्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्याच पत्रात त्यांनी आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत संसदेतील सेना कार्यालयावर दावा सांगितलेला आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या पत्रावर काय निर्णय देतात, हे पाहावं लागेल.
शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे गटासोबत
१. श्रीकांत शिंदे – कल्याण
२. राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई
३. हेमंत पाटील – हिंगोली
४. प्रतापराव जाधव – बुलडाणा
५. कृपाल तुमाणे – रामटेक
६. भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
७. श्रीरंग बारणे – मावळ
८. संजय मंडलिक – कोल्हापूर
९. धैर्यशील माने – हातकणंगले
१०. सदाशिव लोखंडे – शिर्डी
११. हेमंत गोडसे – नाशिक
१२. राजेंद्र गावित – पालघर