नवी दिल्ली: शिवसेना वि. शिंदेसेना यांच्यातील सामना सुरूच आहे. शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर १२ खासदारांनीदेखील तोच मार्ग धरला. या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं आहे. यानंतर शिंदे समर्थक खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांवर हल्लाबोल केला. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत.

विनायक राऊत यांनी पक्ष संघटनेत पदं देताना, निवडणुकीवेळी तिकिटांचं वाटप करताना पैसे उकळले. त्याच्या तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्या होत्या, असे आरोप हेमंत पाटील यांनी केले. ‘मी शिवसेनेत शाखाप्रमुख म्हणून सुरुवात केली. त्यानंतर १२ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. जिल्हाप्रमुख कोणत्या परिस्थितीत कामं करतात याची मला कल्पना आहे. राऊतांसारखे लोक जिल्हाप्रमुखांना जाण्यायेण्याची तिकिटं काढायला सांगतात,’ असं पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंसोबत पॅचअप करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं थेट अन् स्पष्ट उत्तर
आमदार संतोष बांगर जिल्हाप्रमुख होते. तेव्हा विनायक राऊत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी, जेवणावळीसाठी बांगर यांच्याकडून पैसे घेतले. सोन्याच्या चेन घेतल्या. लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पैसे घेतले गेले, असे धक्कादायक आणि गंभीर आरोप पाटील यांनी केले.
२०२१ लाच पवारांना धक्क्याची तयारी, ठाकरे मोदींना भेटले, पण भास्कररावांच्या एका गेमने प्लॅन फसला
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आम्ही १५ ते २० लाख लोकांमधून निवडून येतो. त्यांना आम्ही बांधिल आहोत. त्यांची कामं झाली नाहीत तर आम्हाला त्यांना उत्तरं द्यावी लागतात. संजय राऊत सतत टीका करत असतात. त्यांनी एकदा निवडून येऊन दाखवावं. लवकरच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक आहे. राऊत यांनी कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवावी आणि नगरसेवक होऊन दाखवावं, असं आव्हान जाधव यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here