आपल्या आयुष्यातील ५२ वर्ष शिवसेनेची सेवा केल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी हकालपट्टी हा शब्द कानावर पडला, अशा भावना व्यक्त करताना रामदास कदम यांचा ऊर दाटून आला. प्रसारमाध्यमांना मुलाखती देताना ते ढसाढसा रडले. उद्धव ठाकरेंचे काही निर्णय चुकले, असं सांगत बाळासाहेब ठाकरे आज असायला हवे होते, अशी आवर्जून त्यांनी आठवण जागवली. या साऱ्या प्रकारावर तथा रामदास कदम यांच्या हकालपट्टीवर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. आज ते जिल्हाप्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीला संबोधित करत होते.
रडण्याचे ढोंगसोंग करु नका,तुम्हाला शिवसैनिक पुरतं ओळखून आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, “आमदार-खासदारांना मी देखील डांबून ठेऊ शकतो. पण याला लोकशाही म्हणायचं का?? तुम्ही मनाने तिकडे गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला डांबून ठेवू शकतो. असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. मी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटतोय. त्यांना सगळ्यांना सांगितलंय, ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा, पण नाटकं करुन जाऊ नका. उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं. शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्याही तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करु नका. शिवसैनिक तुम्हाला पुरतं ओळखून आहे”.
आपल्याला संपवायला हे सगळे सुडाने पेटले आहेत
“आज जे काही आपल्यासोबत होतंय ते पाहून असं वाटतंय की हे सगळे आपल्या मुळावर घाव घालायला निघाले आहेत. आपण इतके वर्ष ज्यांना आपलं मानलं, ते आपल्याला संपवायला एवढे सुडाने पेटले आहेत की काहीही करुन शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्यावरच घाव घालत आहेत”
जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही
“माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. जो बाळासाहेबांचाही होता. मागितलं तर आम्ही काहीही देऊ पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिला.