महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास विद्युत पुरवठा करणारा महावितरणची डीपी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतच आहे. पण मागील सहा दिवसांपासून ती डीपी नादुरुस्त आहे. ही डीपी दुरुस्त केली जावी यासाठी मागील पाच दिवसांपासून गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख मुस्तफा, शेख अमजद, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, दीनानाथ घिसडे आदींनी महावितरण अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला होता. पण महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही दाद दिली गेली नाही.
डीपी बंद असल्याचा रिपोर्ट तुम्ही स्वतः परभणीला घेऊन जा मगच डीपी येते, असं उत्तर अधिकारी ग्रामस्थांना देत होते. यादरम्यान, गावातील एका महिलेस प्रसुती साठी महतपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. इन्वर्टरची बॅटरी संपल्याने तेही चालत नव्हते. अशावेळी कर्मचाऱ्यांनी सदरील महिलेला पुढे गंगाखेड या तालुक्याच्या ठिकाणी न पाठवता महिलेची प्रसुती उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात केली. ही डीपी बंद असल्याने जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा बोरही बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने स्वच्छ पाणी मिळायचे बंद झाले. गावात ३३ केव्ही उपकेंद्र असूनही कायमस्वरूपी लाईनमॅन अभावी हा वीज पुरवठा खोळंबला आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत करा
महापूर येथील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हा प्रकार घडल्यानंतर आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे यांनी गंगाखेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आता उपविभागीय अधिकारी यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.