मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचत आमदार-खासदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली असली तरी पक्ष मात्र सोडलेला नाही. मी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचं शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्याचा शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला असून त्यांच्या दिल्ली दौऱ्यावरही टीकेची झोड उठवली आहे. ‘महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत,’ असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेनेनं आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीचा दाखला देत दिल्लीसमोर झुकल्याने शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याचं म्हटलं आहे. ‘स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या ‘युती’त होते; पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झालं आहे,’ अशा शब्दांत ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

Supreme Court : ठाकरे Vs शिंदे, शिवसेनेवर मालकी नक्की कोणाची? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

‘महाराष्ट्र लवकरच पेटून उठेल’

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेनेनं मराठी अस्मितेलाही साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे यांच्या रुपाने महाराष्ट्राला दिल्लीपुढे झुकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळ्या खाताना दिसत आहे, हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी त्या संकटात ‘बये दार उघड’ अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो लवकरच पेटून उठेल,’असा इशारा शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेतृत्वाला दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेनं केलेल्या या शाब्दिक हल्ल्याला शिंदे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here