नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसागणिक नवनवे डाव टाकून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर काल पक्षाचे लोकसभेतील १२ खासदारही वेगळे झाले. या खासदारांनी आपला गट स्थापन केल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यताही दिली. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘फुटीर गट चंद्रावरही स्वत:चं कार्यालय सुरू करू शकतो, एवढ्या हवेत ते सध्या आहेत. या गटाला शिवसेना भवनाचा, मातोश्री आणि सामना दैनिकाचाही ताबा हवा आहे. अशा पद्धतीने ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचंही घर ताब्यात घेतील. तसंच शिवसेना हा आमचा मूळ पक्ष असून बाळासाहेब ठाकरे यांना आम्हीच शिवसेनेत आणलं, असं सांगायलाही हा फुटीर गट मागेपुढे पाहणार नाही. या महाराष्ट्रात आता काहीही होऊ शकतं,’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे अमितभाईंना म्हणाले, ‘अपून दोनो जरा अंदर बैठेंगे’; दानवेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
‘सर्वोच्च न्यायालयात आज निकालाची शक्यता कमी’
‘शिंदे गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मिळालेल्या मान्यतेवर यापुढे तांत्रिक आणि कायदेशीर लढाई होत राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे आमचंही लक्ष आहे. सुनावणी सुरू होणार असली तरी लगेच निकाल दिला जाईल, असं वाटत नाही. या देशात लोकशाही जिवंत आहे हे सिद्ध होऊन न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, याची खात्री आहे,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईतील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडे चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवण्यात आलं आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आपण ईडीकडे आणखी वेळ मागणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं माहीत असूनही मी तपास यंत्रणांसमोर जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. आता पुन्हा समन्स आल्याने मी चौकशीसाठी हजर होईल. मात्र संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने ईडीकडे मी वेळ मागणार आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये मला अशा प्रकारचं समन्स येईल, याची महाराष्ट्राला आणि देशाला अपेक्षा होतीच,’ असंही ते म्हणाले.