पुणे : शिवसेनेच्या राज्यभरातील अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे इतरही नेते शिंदे गटात सामील होत आहेत. पुणे जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडलं असून मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला. आढळराव पाटील यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी याबाबत बैठक घेऊन आपली भूमिकाही जाहीर केली. मात्र या निर्णयानंतर शिरूर मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी आढळराव पाटलांविरोधात आक्रमक होत पुणे- नाशिक महामार्गावर आंदोलन केलं आहे.
आढळराव पाटील यांच्या बंडाच्या निमित्ताने शिरूर मतदारसंघातही शिवसेनेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. शिवसैनिकांनी आक्रमक होत आढळराव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, या आंदोलनात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा समनव्यक अॅड. गणेश सांडभोर, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, अमोल विरकर, तुषार सांडभोर, कुमार ताजवे, निलेश वाघमारे, चंद्रकांत भोर, महेंद्र घोलप, बबनराव दौंडकर, सचिन पडवळ, बाजीराव बुचुडे आदी शिवसैनिक सभागी झाले होते. अॅड. गणेश सांडभोर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.