पाटणा: बिहारमधील दारुबंदीची शिक्षा एका जर्मन शेफर्ड कुत्र्याला भोगावी लागत आहे. ६ जुलैला बक्सर जिल्ह्याच्या मुफसिल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गाझीपूर सीमेवर एक कार पकडली. कारमधील २ जणांकडून विदेशी मद्याच्या ६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारमध्ये असलेल्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हापासून कुत्र्याला पोलीस ठाण्याच्या आवारातच ठेवण्यात आलं आहे.

गेल्या १२ दिवसांपासून कुत्रा पोलीस ठाण्यातच राहत आहे. आता कुत्रा त्रासला असून त्याची देखरेख करणाऱ्या पोलिसांची अवस्थादेखील बिकट आहे. या कुत्र्याला दररोज दूध आणि कॉर्नफ्लेक्स खायला द्यावं लागतं. कुत्र्याची देखरेख करताना, त्याची काळजी घेताना पोलिसांची दमछाक होते, असं बक्सरच्या मुफसिल पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेल्या अमित कुमार यांनी सांगितलं.
अमेरिकन डॉक्टरांवर विश्वास नाही! २६ तासांची फ्लाईट, १ कोटी खर्चून मुलांनी आईला भारतात आणलं
कुत्र्याला त्याच्या मालकानं अतिशय आरामात ठेवलं होतं, असं त्याच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. त्यामुळेच पोलीस ठाण्यात कुत्र्याची अडचण होत आहे. मात्र मालकाच्या चुकीची शिक्षा कुत्र्याला भोगावी लागत आहे. कायदा माणसांसाठी आहे. मात्र माणसांच्या चुकीमुळे प्राणी अडचणीत आला आहे, असं अमित कुमार म्हणाले. या कुत्र्याला फक्त इंग्रजी भाषा समजते. त्याला हिंदी कळत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी काय बोलत आहेत, त्याला काय सांगत आहेत, ते कुत्र्याला कळत नाही, अशी अडचण कुमार यांनी सांगितली.
वर्षभरात किती भारतीय पाकिस्तानात स्थायिक झाले? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच चकित
मुफसिल पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या परीनं कुत्र्याची काळजी घेत आहेत. कुत्र्याला भूक लागली की त्याला लगेच जेवण दिलं जातं. मात्र तरीही कुत्र्याचे हाल होत आहेत. तो आजारी पडला आहे. कुत्र्याला होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन पोलिसांनी पकडण्यात आलेल्या कारच्या नंबरच्या आधारे कुत्र्याच्या मालकाला सूचना दिली. मात्र ४ दिवस उलटून गेल्यावरही त्याला घेऊन जाण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here