सत्ता द्या, सत्तेत आल्यानंतर जर ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही तर राजकारणातून निवृत्ती घेतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. धनगर समाजालाही आरक्षण देणार होतात, त्याचं काय झालं? अशी विचारणाही अनेकांनी फडणवीसांना केली होती. त्यानंतर फडणवीसांनी टेक्निकल मुद्दे सांगून आरक्षण कशा प्रकारे देता येईल, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.
शिंदे-फडणवीसांना सत्तेत येऊन तीन आठवडे झालेत. आज सुप्रीम कोर्टात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पार पडलेल्या अतिशय महत्त्वाच्या सुनावणीत कोर्टाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिले आहे. कोर्टाच्या निर्देशानंतर भाजप नेते आमदार जयकुमार रावल यांनी फडणवीसांच्या त्या वाद्याची आठवण करुन देताना फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
जयकुमार रावल म्हणाले, “राज्यात सत्तेत आल्यानंतर चार महिन्याच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण नाही मिळवून दिले तर राजकारण सोडेल असा शब्द तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला मान्यता दिली असून या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिलेला राजकीय आरक्षणाचा शब्द महायुतीचे सरकार आल्यानंतर पाळला आहे”