बारामती: एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील सत्ता समीकरणं बदलली. सत्ता परिवर्तन झालं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील बहुतांश आमदार, खासदार आहेत. त्यातच भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन त्यांच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत. ठाकरेंकडे धनुष्यबाण राहणार की जाणार, इथपर्यंत लढाई पोहोचली असताना आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची चिंतादेखील वाढली आहे.

सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात विधानसभेचे ६ मतदारसंघ येतात. बारामती शहर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोरचा समावेश बारामतीत होतो. २०१४ च्या निवडणुकीत सुळे ५० हजार मतांनी विजयी झाल्या. २०१९ मध्ये त्यांचं मताधिक्य १ लाखापर्यंत वाढलं. त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत सुळेंना सर्वाधिक मतं बारामती शहरमधून आली होती. त्यापाठोपाठ इंदापूर, भोर आणि पुरंदरमधूर सुळेंना चांगलं मतदान झालं होतं. मात्र दौंड आणि खडकवासलामध्ये त्यांना धक्का बसला.
वर्षभरात किती भारतीय पाकिस्तानात स्थायिक झाले? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच चकित
२०१९ नंतर अनेक समीकरणं बदलली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांचं इंदापूरमध्ये चांगलं वर्चस्व आहे. २०१९ च्या निवडणुकीत सुळेंना मताधिक्य मिळवून देण्यात पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली होती. आता पाटील भाजपमध्ये असल्यानं समीकरणं बदलली आहेत. पुरंदरमधील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे शिंदे गटात गेले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. मात्र शिवतारे कट्टर पवार विरोधक मानले जातात. पुरंदरवरील पवारांची पकड सैल करण्यात शिवतारेंचा मोठा वाटा आहे. शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.

दौंड मतदारसंघात सुळेंना फार चमक दाखवता आली नव्हती. २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघात भाजपच्या राहुल कुल यांनी विजय मिळवला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भोरमधील समीकरणदेखील सुळेंच्या विरोधात आहे. या ठिकाणी सुळेंना गेल्या निवडणुकीत निसटती आघाडी मिळाली. काँग्रेसचे संग्राम थोपटेंनी त्यावेळी सुळेंना मदत केली होती. मात्र आता थोपटे राष्ट्रवादीवर नाराज आहेत. नाना पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं. त्यानंतर या पदासाठी थोपटे उत्सुक होते. मात्र अध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच नाही आणि थोपटेंच्या हातून संधी गेली.
कुत्र्याला भोगावी लागतेय दारुबंदीची शिक्षा; फक्त इंग्रजी येत असल्यानं पोलीस वैतागले
मतदारसंघातील समीकरणं बदलली असल्यानं सुळेंची चिंता वाढली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद घेण्याची दाट शक्यता आहे. तसं झाल्यास फडणवीस स्वत: पुण्यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होईल. या निवडणुकीत बारामती जिंकण्याची जबाबदारी भाजप नेतृत्त्वानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे सुळेंसमोर येत्या निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here