नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार असून, त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीकडून यशवंत सिन्हा रिंगणात आहेत. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४ हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद २४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.

विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा हे या निवडणुकीत चांगली लढत देतील, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता. मात्र नंतर एनडीएत नसलेल्या पक्षांनीही द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदासाठी आपला पाठिंबा जाहीर केल्याने या निवडणुकीत मुर्मू यांचं पारडं जड मानलं जात आहे. बिजू जनता दल (बीजेडी), वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसप), अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक), जनता दल (धर्मनिरपेक्ष), तेलगू देसम पार्टी (टीडीपी), शिरोमणी अकाली दल, शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा सारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यामुळे मुर्मू यांच्या मतांची टक्केवारी जवळपास दोन तृतीयांशपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरू शकतात.

शिवसेना हायजॅक करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल; शिंदेंचा थेट ‘धनुष्यबाणा’वर दावा

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार कोणाला असतो?

देशभरातून निवडून आलेले खासदार आणि राज्य विधानमंडळांचे सदस्य (आमदार) समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. या निवडणुकीत नामनिर्देशित खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नसल्याने खासदारांच्या मताचे मूल्य ७०८वरून ७००वर आले आहे.

राज्यातील आणखी तीन आमदारांना मंत्रिपदासाठी फोन; दिल्ली- ठाणे कनेक्शन समोर

महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य किती?

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य वेगवेगळे असते. उत्तर प्रदेशात निवडून आलेल्या आमदारांची संख्या ४०३ आहे. प्रत्येक आमदाराचे मतमूल्य अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २०८ आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू आणि झारखंडच्या प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य १७६, तर महाराष्ट्रातील आमदारांचे मतमूल्य १७५ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here