सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये दुर्घटना घडत आहेत. दरड कोसळून रस्ते ठप्प होण्यासह काही ठिकाणी जमिनीला भेगा पडत असल्याचं समोर आलं होतं. अशातच महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी शेजारी असलेल्या ब्लूमिंग डेल हायस्कूलच्या शेजारील डोंगरालाही मोठमोठ्या भेगा पडल्या असून या शाळेच्या इमारतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, सध्या पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यात येत आहेत.