मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे आमदार आणि खासदार फुटल्यानंतर आता पक्ष सावरण्यासाठी आदित्य ठाकरे जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी आदित्य ठाकरे हे सध्या मुंबईत ठिकठिकाणी फिरून शिवसेनेला (Shivsena) नवी उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्य शिवसैनिकांशी संपर्क साधण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सुरु केलेल्या ‘निष्ठा यात्रे’ची (Nishtha Yatra) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आदित्य ठाकरे बुधवारीही ‘निष्ठा यात्रा’ घेऊन मुंबईतील वडाळ्यात परिसरात पोहोचले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्याठिकाणी छोटेखानी भाषण केले. हे भाषण सुरु असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. या पावसातील सभेची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा प्रचंड गाजली होती. शरद पवार यांच्या या पावसातील सभेनंतर विधानसभा निवडणुकीचं वारंच बदललं होतं. तेव्हापासून राज्यातील कोणत्याही वक्त्याने पावसात भाषण केले तर तो चर्चेचा विषय ठरतो. मात्र, आता आदित्य ठाकरेंचे हे पावसातील भाषण पक्षासाठी किती फायदेशीर ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.

या सभेत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली. आदित्य ठाकरे हे वारंवार बंडखोरांना ‘गद्दार’ म्हणून डिवचत आहेत. कालच्या सभेतही आदित्य ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार केला. सरकार चालवताना आपण मुंबईला सगळ्यात जास्त लक्ष दिलं. उद्धव ठाकरे चांगला माणूस असं लोकं म्हणतात. असं बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

आदित्य ठाकरेंची आजपासून शिवसंवाद यात्रा

आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील सभांना शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्यानंतर त्यांची शिवसंवाद यात्रा आजपासून महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु होणार आहे. तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी,औरंगाबाद आणि अहमदनगरमधील शिर्डीमधील शिवसैनिक आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील.

Deepak Kesarkar: ‘आम्हाला ‘गद्दार’ म्हणताना दहावेळा विचार करा’; दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना खडसावले
आदित्य ठाकरे ठाण्यातही शक्तीप्रदर्शन करणार

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला भिवंडीमधून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ते त्यांचं ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येईल. आदित्य ठाकरे सत्तानाट्यानंतर ठाण्यात प्रथम शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यानंतर भिवंडीतदुपारी १२ वाजता शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here