म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरः काँग्रेस प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद पक्षश्रेष्ठींकडे मांडण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर व्यक्त करण्यात आला. शहरातील पदाधिकारी व नेत्यांनी साकोली येथे त्यांची मंगळवारी भेट घेऊन स्थगिती देण्याची मागणी केली.

राष्ट्रीय सहसचिव नितीन कुंभलकर, सेवादलाचे समन्वयक के.के. पांडे, प्रदेश सरचिटणीस तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार, संजय दुबे आदी मंडळींनी नाना पटोले यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. शहरातील अनेकांनी सर्वाधिक सदस्य केले. प्रदेश प्रतिनिधीसाठी कुठल्याही निवडणुका झाल्या नाही. यानंतरही नावे निश्चित करण्यात आली. त्यामुळे यादीला तत्काळ स्थगिती द्यावी. तसेच, एका कुटुंबातील दोन सदस्य न ठेवता, एक कुटुंब एक पद ठेवावे, अशी मागणी नेत्यांनी केली. प्रदेशने निवडणूक घ्यावी. संघटन बळकट करण्यासाठी झटणाऱ्यांना न्याय देण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. सर्वांना निवडणुकीचा निकाल मान्य राहील, अशी भूमिकाही चर्चेदरम्यान मांडण्यात आली. आपण नागपूरचे नेते आहात लोकसभा निवडणूक लढले, प्रदेशाध्यक्षाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.

याबाबत अद्याप काहीही झालेले नाही, योग्य निर्णय घेऊ, अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिल्याचा दावा तानाजी वनवे यांनी केला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आली आहे. याविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी काही पदाधिकारी व नेते दिल्लीला जाणार नाही. नागपुरातील स्थिती गांधी व प्रदेश प्रभारी एच.के. पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे. उद्या, शुक्रवारी भेट झाल्यास त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही वनवे यांनी स्पष्ट केले.

आज आंदोलन
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने आज, गुरुवारी हजर राहण्याची नोटीस बजावल्याने संतप्त पदाधिकारी व नेते मंडळी सेमिनरी हिल्स येथील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता निदर्शने करणार आहे. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार सुरेश धानोरकर, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, आमदार अॅड. अभिजित वंजारी, सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार, डॉ. गजराज हटेवार आदी सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here