eknath shinde cabinet, मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार? भाजपच्या ६ दिग्गजांसह एकूण ३० मंत्री शपथ घेण्याची शक्यता – eknath shinde and devendra fadanvis state cabinet is likely to be expanded tomorrow 30 ministers to take oath
मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन तीन आठवडे उलटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सर्व खात्यांचा कारभार पाहात आहेत. मात्र आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यात एकूण ३० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे समजते.
महाविकास आघाडी सरकार पाडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर शिवसेना आमदारांचा गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन तृतीयांश मंत्री असतील तर उर्वरित मंत्रिपदे शिंदे गटातील आमदारांना मिळतील, असं सांगितलं जात आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे, थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केलेल्या नेत्यांनाही मंत्रिपदाचे बक्षीस मिळणार आहे. यामध्ये उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश असेल, अशी माहिती आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने ५० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र भाजपचे विधानसभेत १०६ आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद जरी शिंदे यांच्याकडे असले तरी मंत्रिमंडळात वजनदार खाती आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.
शपथविधी सोहळ्याच्या स्वरुपावरून शिंदे गटात मतमतांतरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांमध्ये मंत्र्यांच्या शपथविधीबाबत मतमतांतरे असल्याचे समजते. राज्यातील पावसाची स्थिती लक्षात घेत शपथविधी सोहळा भव्यदिव्य नसावा, असं काही आमदारांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे विधानभवन परिसरात हा शपथविधी सोहळा व्हावा, अशी मागणी काही शिवसेना आमदारांनी केल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप कोणीही अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही.