आजारी लेकराचा जीव वाचवण्यासाठी मातेनं पुरातून काढला मार्ग, धाडसी ‘हिरकणी’चा VIDEO व्हायरल… – mother made her way through the flood to save the life of a sick child video viral buldhana news
बुलडाणा : हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं. जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाचा खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आपल्याला आजही आठवते. बुलडाणा जिल्ह्यातील अशाच एका हिरकणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या आजारी मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी या मातेने चक्क नदीच्या पुरातून मार्ग काढला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. घाटाखाली पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यातच मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क मलकापूरपासून तुटला आहे. कारण, गावाला चारही बाजूने विश्र्वगंगा नदीने वेढलेले आहे आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरसोडा मार्गे मलकापूर. पण मध्यभागी असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना कुठेही जाता येता येत नाही. बायकोला परत घरी आणण्यासाठी पतीने अख्ख्या गावाचं टेन्शन वाढवलं, आमदारकी ऑफर दिली, पण…
दरम्यान, गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे..? असा प्रश्न काळे कुटुंबासमोर होता. यावेळी त्यांनी टायरवर बसून पुरातून माता आणि चिमुकल्याला उपचारासाठी नेले. एक पाच सहा फूट खोल पाण्यातून जीव मुठीत धरून या महिलेने पूल पार करत आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूरला आणले आणि आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवला.
या धाडसी मातेच्या प्रवासाचा गावातील काही लोकांनी व्हिडिओ काढला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.