कोल्हापूर : कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने निष्ठावान शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. हे शिवसैनिक आता खासदार मंडलिक यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत आहेत. संजय मंडलिक यांना चार ते पाच तालुक्यांतून लोकसभेसाठी मतदान होत असतं. मात्र शिंदे गटात जाण्याअगोदर मंडलिक यांनी फक्त कागलमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामुळे इतर तालुक्यातील शिवसैनिक प्रचंड नाराज झाले आहेत. संजय मंडलिक यांच्या बंडाविषयी बोलताना आजरा येथील शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय येसादे यांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांनी मंडलिकांच्या विजयासाठी घेतलेल्या मेहनतीचा पाढाच वाचून दाखवला.

‘संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस एक केला, अनवाणी पायाने फिरलो, अनेक नवसही केले आणि आता त्याच मंडलिकांनी आमचा विश्वासघात केला आहे,’ अशा शब्दांत संजय येसादे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच येसादे यांचे संजय मंडलिक यांच्या प्रचारादरम्यान अनवाणी फिरल्याचे फोटोही समोर आले आहेत.

‘उद्धव ठाकरे बेडवरून हलू शकत नव्हते तेव्हाच ‘गद्दारांनी’ मुख्यमंत्रीपदासाठी जुळवाजुळव सुरु केली’

‘मंडलिकांसाठी दिल्लीचे दरवाजे आपोआपच बंद होतील’

शिवसेनेतून बंडखोरी केलेले संजय मंडलिक पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजयी होणार नाहीत, असं म्हणत शिवसैनिक आपला रोष व्यक्त करत आहेत. ‘कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार निवडून यावेत, असं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करताना संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला, प्रसंगी अनवाणी पायांनी फिरलो. मतदारसंघ पिंजून काढला आणि संजय मंडलिक निवडून आल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही, असा निश्चयही केला. परंतु आता त्याच मंडलिक यांनी सत्तेच्या राजकारणात अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला. वास्तविक हा निर्णय मतदारसंघातील शिवसैनिकांना विश्वासात घेऊन घेणे आवश्यक होते. कारण जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणले आहे. मात्र खासदार मंडलिक यांनी तसं न करता परस्पर निर्णय घेतला. पुढील निवडणुकीत त्यांच्याकरता दिल्लीचे दरवाजे आपोआपच बंद होतील,’ असा इशारा शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय येसादे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here