एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट प्रत्येक पातळीवर चोख उत्तर देत आहेत. विधिमंडळ गट फोडल्यानंतर तसेच नवे गटनेते नेमल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तोच कित्ता नवी दिल्लीतही गिरवला. तिकडेही शिवसेनेचे १२ खासदार फोडून तसेच नवे गटनेते आणि व्हिप नेमून आपली राजकीय त्यांनी दाखवून दिली. न्यायालयीन लढाईत देखील ठाकरे गटाला तोडीस तोड उत्तर शिंदे गट देत आहे. सध्या बंडखोरांविरोधात आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना शिंदे गटाच्या आमदारांनी भूमिका आताच्या परिस्थितीला धरुन कशी बरोबर आहे, हे जनतेला पटवून देण्याकरिता पूर्वेश सरनाईक महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
युवासेनेची जबाबदारी आता पूर्वेश सरनाईकांच्या खांद्यावर
राज्यातल्या प्रत्येक विभागातून ठाकरेंवर नाराज असलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची शिंदे गटाकडे ओढ आहे. हेच नाराज पदाधिकारी हेरुन आगामी काळात त्यांची शिंदे गटाकडे कशी एन्ट्री होईल, यावर पूर्वेश सरनाईक काम करणार आहेत. एकंदरित शिंदे गटाची ताकद वाढविण्याची मदार युवासेना म्हणून पूर्वेश सरनाईक यांच्या खांद्यावर असेल. त्यामुळे शिवसेनेला प्रत्येक पातळीवर टक्कर देणाऱ्या शिंदे गटाने युवराज आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याला उत्तर देण्यासाठी पूर्वेश सरनाईक यांना मैदानात उतरवून मोठी खेळी खेळली आहे.
ठाकरे पिता पुत्र मैदानात
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करत ठाकरे पितापुत्र मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भवनात येऊन उद्धव ठाकरे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना भेटत आहे. त्यांच्याकडून स्थानिक पातळीची माहिती घेत आहेत तसेच आगामी काळात तालुका-जिल्ह्यावार प्लॅन त्यांना समजावून सांगत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरेही मुंबई शहर आणि उपनगरांत जाऊन बंडखोरांवर तुटून पडत आहेत. दररोज दोन-तीन सभा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या संकटाच्या काळात बंडखोरांनी कशी गद्दारी केली, हे सांगण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. याचवेळी पुढच्या वेळी बंडखोर आमदार विधान भवनाची पायरी चढणार नाही, असा प्रणही वारंवार आदित्य ठाकरे बोलून दाखवत आहेत.
पक्षादेश झुगारून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या शिवसेनेतील कोणत्या ना कोणत्या पदाधिकाऱ्यांची दररोज हकालपट्टी होत आहे. आज पूर्वेश सरनाईक यांची पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांचीही युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
कोण आहेत पूर्वेश सरनाईक?
पूर्वेश सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत.
अगोदर युवा सेनेचे सचिवपदाची जबाबदारी होती.
युवासेनेच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
पूर्वेश यांची पत्नी परिषा सरनाईक या ठाणे महापालिकेत नगरसेवक
प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात