हॉस्टेलच्या वार्डन सविता विणकरे या २१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वसतिगृहात नियमित तपासणी करत असताना एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार मुख्याध्यापक किशन खांडरे यांच्या कानी घातला. त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर फौजदार शिवाजी बोंडले, राठोड, शिवाजी पवार हे घटनास्थळी पोहोचले.
सदर मुलीच्या पालकांना याबाबत खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला. मुलीचे प्रेत बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे. रात्रीच्या वेळी शवविच्छेदनाची सोय येथे नसल्याने उद्या शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप दुर्गे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली आहे. माजी आमदार डॉ. संतोष टारफे, डॉ. सतीश पाचपुते रुग्णालयात दाखल झाले असून तेही घटनेची माहिती घेत आहेत. दरम्यान,याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कळमनुरीचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांना बाळापूर येथे पाठवले आहे. नातेवाईकांकडून शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. कापलेल्या खुणा कशाच्या आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत. अशात माझी मुलगी शासकीय निवासी आश्रम शाळेत शिकायला असताना शाळा प्रशासनाच्या ताब्यात होती. त्यांनी तिला त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आश्रम शाळेतील खोलीमध्ये गळफास घेतला असल्याचे नातेवाईकांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत.