परभणी : आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या १८ पैकी तब्बल १२ खासदारांनी वेगळा गट स्थापन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. लोकसभेतील केवळ सहा खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचाही समावेश आहे. खासदार जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्येही फाटाफूट झाली नव्हती. मात्र आता परभणीत शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती माधव कदम पाटील यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. माधव कदम पाटील हे पंचायत समिती सदस्य होते आणि पंचायत समितीत शिवसेनेचे गटनेतेही होते. मात्र नुकताच पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्याने ते माजी गटनेते झाले आहेत. पाटील यांची कावलगाव जिल्हा परिषद गटात ताकद आहे.

या गटातील काही गावच्या सरपंचांनीही मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही बंडखोरीने शिरकाव केल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे माझ्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी देणार असल्याचे माधव पाटील यांनी सांगितलं.

‘आता तुमचा ‘धनुष्यबाण’ डोहाळे जेवणासाठी भाड्याने द्या’; मनसेनं शिवसेनेला डिवचलं

परभणी जिल्हा आणि शिवसेना

राज्यभरातील आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला समर्थन देत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परभणी जिल्ह्याचे खासदार आणि आमदार मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आहेत. ‘मला आजपर्यंत जे काही मिळालंय ते पक्षामुळेच मिळालं आहे, प्रत्येक राजकीय पक्षाच्या वाटचालीत चढ-उतार येत असतात. मात्र अशा कठीण काळात मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही,’ असं म्हणत खासदार संजय जाधव यांनी याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here