२०१४ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा आदेश आला अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात सातत्याने सुप्त स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेतून पुढे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली होती. नंतरच्या काळात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांना यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये अक्षरश: अडगळीत पडले होते. त्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले नव्हते. या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. परंतु, त्यांच्या आरोपांची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. अखेर एकनाथ खडसे यांनी २०२० मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाही एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय खच्चीकरण केले, मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, असे गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केले होते. आता विधानपरिषेवर निवडून गेल्यानंतरही सभागृहात एकनाथ खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांच्या अजितदादांना शुभेच्छा
आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच रोहित पवार यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’ व्यक्तिमत्त्व आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.