सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात आज करोनाचा आणखी रुग्ण आढळल्याने व तो मुंबईतून आलेला असल्याने प्रशासन हादरलं आहे. जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या तिन्ही करोनाबाधित रुग्णाचं मुंबई कनेक्शन आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे चार रुग्ण आढळले असून त्यातील एक रुग्ण पूर्ण बरा झाला आहे व त्याला घरी सोडण्यात आले आहे. बाकी तिन्ही रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये स्थान मिळाले आहे. मात्र, ही यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात नव्याने करोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यात करोनाचे आता एकूण चार रुग्ण झाले असून जिल्ह्याला मिळालेला ग्रीन झोनचा दिलासा औटघटकेचाच ठरल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाचे वय २७ वर्षे असून तो मुंबईतून गावी परतला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा तरुण २८ एप्रिल रोजी मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. करोनाबाधित क्षेत्रातून आला असल्याने ५ मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आला असून त्याला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ झाली असून त्यापैकी १ रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे तर ३ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा यापूर्वीच सील करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने आवश्यक ती सर्व दक्षता घेतली आहे. हा जिल्हा मुंबईशी खूपच जवळीक असलेला जिल्हा आहे. सिंधुदुर्गातील चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईत आहेत. आपल्या गावी परतण्यासाठी ते वाट पाहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन तसेच जिल्ह्यात आढळलेल्या चारही रुग्णांची मुंबई प्रवासाची हिस्ट्री पाहून प्रशासन सावधपणे पावले टाकत आहे. मुंबईहून येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यासाठी शाळा व अन्य सरकारी इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here