Vitthal Sahkari Sakhar Karkhana : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला यावर्षी धक्का बसला आहे. अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीनं विजय मिळवला आहे. या विजयानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा कोणाकडे जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर अभिजीत पाटील यांची एकमतानं कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलताताई रोंगे यांची निवड झाली आहे. दरम्यान, चेअरमनपदी निवड झाल्यानंतर निवडणूक अधिकारी नागेश पाटील  यांच्या शुभहस्ते कारखान्याचे रोलरचे पूजन करण्यात आलं.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 5 जुलैला मतदान झालं होतं. या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. यामध्ये सत्ताधारी असणाऱ्या भालके गटापुढं युवराज पाटील आणि अभिजीत पाटील या दोन गटांचं मोठं आव्हान होते. सर्वच राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं या निवडणुकीत ‘विठ्ठल’ कोणाला पावणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी बाजी मारली. अभिजीत पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह प्रा.बी.पी. रोंगे सर यांनी सहकार्य केलं. 

21 पैकी 20 जागांवर विजय

दरवर्षी 10 ते 12 लाख टन उसाचं गाळप करणारा कारखाना बंद असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हा करखाना बंद असल्यामुळं सत्ताधारी भालके गटावर विविध प्रकारचे आरोप होत होते. या निवडणुकीत सत्ताधारी असणाऱ्या विठ्ठल परिवारात फूट पडली होती. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन औदुंबंर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांच्यासह अॅड. गणेश पाटील आणि अॅड. दीपक पवार यांनी सत्ताधारी गटातून फारकत घेत त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केला होता. तर या दोन्ही पॅनलपुढे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पॅनलचं मोठं आव्हान होते. मात्र, अखेर अभिजीत पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. 21 जागांपैकी 20 जागांवर जिंकत अभिजीत पाटील यांनी कारखान्यावर एकहाती सत्ता काबीज केली आहे. 

निकालापूर्वीच विजयाचा दावा

दरम्यान, या निवडणुकीपूर्वी एबीपी माझा डीजिटलनं धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन आणि श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळीही या निवडणुकीत विजय आमच्याच पॅनेलचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. कारखान्याच्या 25 हजार 392 सभासद आहेत. यापैकी मी 16 ते 17 हजार सभासदांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या सर्वांचा मला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांची देणी, कामगारांच्या पगारी देऊनच कारखान्यात उसाची मोळी टाकणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळं या हंगामात हा कारखाना सुरु होणार असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
 

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here