एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करत ठाकरे पितापुत्र मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भवनात येऊन उद्धव ठाकरे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना भेटत आहे. त्यांच्याकडून स्थानिक पातळीची माहिती घेत आहेत तसेच आगामी काळात तालुका-जिल्ह्यावार प्लॅन त्यांना समजावून सांगत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरेही मुंबई शहर आणि उपनगरांत जाऊन बंडखोरांवर तुटून पडत आहेत. दररोज दोन-तीन सभा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या संकटाच्या काळात बंडखोरांनी कशी गद्दारी केली, हे सांगण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. कालपासून आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर कडाडून हल्ला चढवला.
ठाकरे कुटुंब विधिमंडळात आले हीच यांची सर्वांत मोठी अडचण
जेव्हा एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो तेव्हा सामान्य माणसाच्या डोळ्यात अश्रू असतात, हे क्वचित दिसतं. याअगोदर महाराष्ट्राने तसं चित्र कधीही बघितलं नव्हतं. जेव्हा आम्ही वर्षा बंगला सोडत होतो तेव्हा तिथले लोक डसाढसा रडत होते, पोलीस बांधवांच्या डोळ्यात अश्रू होते, मुख्यमंत्री कार्यालयातली माणसं कमालीची भावूक झाली होती. शेकडो लोक रस्त्यावर उद्धव साहेबांना अभिवादन करण्यासाठी थांबली होती. उद्धवसाहेब देखील जनतेचं प्रेम बघून गलबलून गेले होते. पण त्याचवेळी त्यांच्या मनात आपल्याच माणसांनी धोका दिल्याचं दु:ख होतं. त्यांना कोव्हिड झालेला असताना, त्यांच्या आजारपणात गद्दारांनी गद्दारी केली. त्यांना काय कमी केलं होतं, आपल्याजवळ जे जे होतं, ते त्यांना दिलं, ज्यांची पात्रता नाही, त्यांनाही आपण मोठं केलं. पण उद्धवसाहेबांची तब्येत बरी नसताना गद्दारांनी बंडखोरी केली. ठाकरे कुटुंब विधिमंडळात आले हीच यांची सर्वांत मोठी अडचण ठरली. आम्हाला वाटायचं की विधिमंडळात बसून काम करतायेत, लोकांची सेवा करतायेत. आमचा एवढा विश्वास होता यांच्यावर पण शेवटी गद्दारी केली, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली.
गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, त्यांची तेवढी लायकी नाही
मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवार प्रहार केला. तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, याचं उत्तर द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना खडसावले.