मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्ली दौऱ्यात शिवसेनेचे १२ खासदार फोडून आपलं राजकीय वजन वाढवलं. ठाकरे गटाचे संसदेतील गटनेते विनायक राऊत यांना पदावरुन हटवून त्यांच्या जागी राहुल शेवाळे यांनी नियुक्त केलं तर भावना गवळी यांना प्रतोदपदावरुन ठाकरेंनी बाजूला केलं होतं, शिंदे यांनी गवळी यांच्याकडे पुन्हा मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी दिली. अशातच शिंदे गटात आणखी ३ खासदारांची एन्ट्री होऊन ठाकरेंकडे केवळ ३ खासदारच उरतील, असा दावा रामटेकचे सेना खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
शिवसेनेच्या ४० आमदारांना तसेच १० अपक्षांना फोडून तीन आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. त्याच फूटनाट्याचा दुसरा अंक चार दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीत पाहायला मिळाला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊनही शिवसेनेचे १२ खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गचात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसला. ठाकरेंकडे केवळ सहा खासदार उरलेले असताना आता त्यातील ३ खासदार शिंदे गटात एन्ट्री करणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.
“विनायक राऊत यांच्यापासून आम्हाला भयानक त्रास झाला. संसदेत आम्हाला ते बोलू देत नव्हते. एखाद्या विधेयकावर जेव्हा चर्चेची वेळ यायची, तेव्हा आमची नावं ते द्यायचे. आम्हीही तयारी करुन जायचो, पण तेव्हा स्पीकर दुसऱ्याच कुणाचंतरी नाव घ्यायचे किंवा ते स्वत:चंच नाव द्यायचे. त्यांना हटविण्याची कारवाई मागील अधिवेशनातच होणार होती. पण ती टळली, जी आता आम्ही १२ जणांनी एकत्र येऊन केली. सध्या राहुल शेवाळे आमचे गटनेते आहेत तर भावना गवळी आमच्या मुख्य प्रतोद आहेत. सध्या आमच्यासोबत १२ खासदार आहेत, लवकरच त्यांची संख्या वाढून १५ होईल.”
मातोश्रीपासून दुरावले कोण?
१. श्रीकांत शिंदे – कल्याण
२. राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई
३. हेमंत पाटील – हिंगोली
४. प्रतापराव जाधव – बुलडाणा
५. कृपाल तुमाणे – रामटेक
६. भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
७. श्रीरंग बारणे – मावळ
८. संजय मंडलिक – कोल्हापूर
९. धैर्यशील माने – हातकणंगले
१०. सदाशिव लोखंडे – शिर्डी
११. हेमंत गोडसे – नाशिक
१२. राजेंद्र गावित – पालघर
ठाकरेंसोबतचे ६ खासदार कोणते?
१.विनायक राऊत – सिंधुदुर्ग-रत्नागिरी
२. गजानन कीर्तिकर – उत्तर पश्चिम मुंबई
३.अरविंद सावंत – दक्षिण मुंबई
४. राजन विचारे – ठाणे
५. ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद
६. बंडू जाधव – परभणी